मुंबई - राज्याच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे, म्हणून मुख्यंमत्री शिवसेनेचाच होणार आहे. तसेच शपथविधीचा कार्यक्रम हा शिवतीर्थावर होणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच भाजपने शपथविधीसाठी काय-काय बुक करून ठेवले आहे, याचे पुरावेदेखील स्वत:कडे असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, भाजप-शिवसेना दोनही पक्ष अजूनही सत्तास्थापन करू शकले नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा पुनरोच्चार केला आहे. तसेच शिवसेनेच्या मुख्यंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम शिवतीर्थावर पार पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -सत्ता स्थापनेचा तिढा 9 तारखेपर्यंत सुटेल - गिरीश महाजन
शपथविधीसाठी भाजपनेही तयारी सुरू केली आहे. माझ्या माहितीनुसार शपथविधीसाठी भाजपने वानखेडे, रेसकोर्स बुक केलं आहे. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि शपथविधी सोहळा शिवतीर्थावर पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने मुंबईतील अनेक गेस्ट हाऊस बुक केली आहेत. मात्र, त्यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा का करण्यात येत नाही? वानखेडे, रेसकोर्स ही ठिकाणे बुक करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, भाजप नेमका शपथविधी घेणार कधी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये येडीयुरप्पांचा सरकार स्थापनेसाठी फॉर्म्युला वापरला तसा महाराष्ट्रात चालणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले. मी अमित शाह यांना ओळखतो. त्यांना परिस्थितीची चांगली ओळख आहे. निवडणुकी नंतर त्यांनी महाराष्ट्रात लक्ष दिले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी शाह यांच्यावर केली.
हेही वाचा -तुमचा शपथविधी राहु द्या, मदतीचे काय? गिरिश महाजनांना शेतकऱ्यांचा घेराव