मुंबई - जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईमधील रस्ते जागतिक दर्जाचे असावेत. रस्त्यावर कचरा नसावा. रस्त्यांचे सुशोभीकरण केले जावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथी गृहावर पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत जाहिरातीचे धोरणही ठरवले जाणार आहे.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, या शहरातील रस्त्यांवरून पालिकेवर वेळोवेळी टिका झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यावर टाकण्यात येणारे डेब्रिज, कचरा यामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. मुंबईत पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. त्यांनाही रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे त्रास होतो. त्यामुळे नागरिकांना चांगले रस्ते मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथी गृहात पालिका अधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, सर्व 24 विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते), प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन), सर्व परिमंडळ उपायुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत मुंबई हद्दीतील रस्त्यांवरील विशेषकरून पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग व पदपथावरील डेब्रिज काढून टाकणे, पदपथाची दुरुस्ती, परिरक्षण व सुधारणा करणे, रस्ते दुभाजक, नामफलक रस्ते व पदपथावर लावणे, सार्वजनिक जाहिराती व जाहिरात फलकाबाबत धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे, शहरातील रस्ते पदपथ सुंदर व आकर्षक दिसावेत म्हणून रस्त्यांवरील अतिक्रमणे, डेब्रिज, कचरा हटविणे, स्वच्छता, साफसफाई, रंगरंगोटी करणे यावर चर्चा होणार आहे.
रस्त्यांचा चेहरा बदलणार