मुंबई -सध्याची परिस्थिती ही राजकारण करण्याची नाही. आताही मात्र, तरीसुद्धा काही लोक राजकारण करत आहेत. आताच्या परिस्थितीतही राजकरण करत राहिलात तर, आपल्याला कोणत्याही शत्रूची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी फेसबुकद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही आभार मानले. सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राज्यवासीयांना अक्षय्य तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती, रमझानच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, दिवस उगवत आहे. दिवस मावळत आहे. मात्र, हे दिवस आपल्याला कोणालाच अपेक्षित नव्हते. आपण ही लढाई लढत आहोत. सर्वधर्मीय देशकर्तव्यासाठी आणि माणुसकीसाठी या लढाईत सहकार्य करत आहात, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
रस्त्यावर किंवा बाहेर येऊन नमाज अदा करू नये, असे आवाहन त्यांनी मुस्लिमांना केले. देव मनात आहेत. आज देव मंदिरात नाही. तो आपल्यासोबत आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कामगार यांच्या रुपात देव आपल्याला मदत करत आहे. त्यांचा आदर नक्कीच करायला हवा. तसेच ज्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांनाही यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
पोलीस कर्मचारी, अधिकारी आज त्यांचा परिवार, घर सोडून सेवा देत आहेत. त्यांचे आभार नक्कीच मानायला हवेत. हे सर्व लोक अत्यंत तणावाखाली मेहनत करत आहेत. गुणाकाराने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लॉकडाऊनमुळे आपण काही स्वरूपात नियंत्रित करू शकलो आहोत. यावर मात करण्यासाठी टास्क फोर्स, तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली आहे. सरकारी पातळीवर शक्य ते सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
सरकारच्या सर्व सुचनांचे पालन करा. रेल्वे तूर्तास सुरू होणार नाही. गर्दी नको आहे. परराज्यातील मजुरांसंदर्भात त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. मात्र, या सर्व स्थितीत संयम बाळगण्याची गरज आहे. नाहीतर आतापर्यंत आपण केलेली सर्व तपश्चर्चा वाया जाईल, असे त्यांनी नमुद केले.