मुंबई - कोरोनाचा कहर वाढल्यानंतर आपल्याला पारतंत्र्यात जावे लागले. गेल्या काही महिन्यांपासून ते अनुभवत आहोत. अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या लोक चळवळीमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोरोनापासून मी माझा देश, राज्य मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार, असा निश्चय करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले. 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या पंटागणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात वीरमरण आलेल्या कोरोना योध्यांना आदरांजली वाहिली.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, कष्ट भोगले, अत्याचार सोसला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात क्रांतीवीरांना, वीरमरण आलेल्या योध्यांना विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणांना धुळ चारून स्वराज्याचा पहिला झेंडा फडवकला आणि आपण परकीयांविरुद्ध विजय मिळवू शकतो, आपले स्वातंत्र्य प्रस्थापित करु शकतो, ही प्रेरणा त्यांनी आपणा सर्वांना दिली. मात्र, पुन्हा एकदा परकीयांनी आक्रमक करुन आपल्याला पारतंत्र्यात ढकलले. एकीकडे स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक समाज सुधारकांनी वाईट वृढीपरंपरांनी मुक्त केला. त्यांनी विषमतेविरुद्ध त्यांनी लढा उभारुन स्वातंत्र्य, स्वराज्याचा अर्थ समजावून दिला, असेही ते म्हणाले.
राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याचा अभिमान असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आशुतोष डुमरे, अशोक अहिरे, विनोद कुमार तिवारी आणि त्यांच्यासोबत ४० ते ४५ पोलीस खात्यातील शूर पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या सगळ्यांचे अभिनंदन आणि कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच कोरोना काळात पोलीस, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले रक्षण करता करता स्वत:चे प्राण गमावले त्यांना अभिवादन करत, श्रद्धांजली वाहिली.