मुंबई- राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. काही भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ७ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार की संचारबंदी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली -
राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आरोग्य विभागाच्या विविध उपाय योजनांमुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा देखील 1 फेब्रुवारीपासून सरकारने सुरू केली. विविध राज्यांत जाणाऱ्या मेल गाड्याही सुरू केल्या. मात्र, नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारी 6112 तर शनिवारी 6281 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांत रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अमरावतीत २ दिवसांचा लॉकडाऊन तर पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तर नाईलाजाने मुंबईत टाळेबंदी-
राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रात्रीची संचारबंदी लावण्याचा सरकारचा विचार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे सांगितले. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर नाईलाजाने मुंबईत टाळेबंदी लावावी लागेल, असे मतही त्यांनी मांडले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सायंकाळी ७ वाजता वाढत्या रुग्णसंख्येबाबत संवाद साधणार असल्याने लॉकडाऊन होणार का? की संचारबंदी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या-
राज्यात 6281 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 93 हजार 913 वर पोहोचला आहे. तर आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 753 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.16 टक्के तर मृत्यूदर 2.47 टक्के आहे. राज्यात आज 2567 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 92 हजार 530 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 56 लाख 52 हजार 742 नमुन्यांपैकी 20 लाख 93 हजार 913 नमुने म्हणजेच 13.38 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 28 हजार 060 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 48 हजार 439 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.