मुंबई - शासकीय विमान वापरावरून आता राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात नव्या शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी राज्यपालांना विमान नाकारल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हाकेच्या अंतरावर असलेल्या राजभवनातील हेलीपॅडवर जाणे टाळले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पालघरमधील जव्हार तालुक्यात दौरा आहे. या दौऱ्याला जाण्यासाठी ते महालक्ष्मी रेसकोर्स हेलीपॅडवरून रवाना झाले. त्यामुळे आता हा चर्चेचा विषय झाला आहे.
काय आहे प्रकरण-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयालास परवानगी मागितली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यलयाकडून परवानगी मिळाली नाही. मात्र या सदर्भातील माहिती त्यांना आयत्यावेळी देण्यात आल्याने त्यांना विमानातून उतरावे लागले होते. त्यानंतर कोश्यारी हे खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले होते. या प्रकरणी राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप नेत्यानींही यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली.
सरकारी विमान ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, राज्यापाल कोश्यारींना अशा प्रकारे विमानातून खाली उतरवणे चुकीचे आहे. अशा प्रकारचा अहंकार महाविकास आघाडी सरकारमध्ये आला कुठून अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालघर दौऱ्यावर जाण्यासाठी राजभवनावरील हेलीपॅडचा वापर न करता महालक्ष्मी रेसकोर्सचा वापर केला आहे. त्यामुळे आता चर्चेला विषय मिळाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
१२ आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीची विमान प्रकरणाला किनार?
राज्यपाल आणि महाविकास आघाडीसरकारमध्ये बिघाडी झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामध्ये सद्यस्थितीत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणाला विलंब होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी नोव्हेंबर महिन्यातच प्रत्येकी चार सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र अद्यापही राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले नाही. त्यातच गुरुवारी राज्यपालांना विमान नाकारल्याचा प्रकार घडल्याने आमदार निवडीच्या प्रकरणाची किनार तर या प्रकरणाला नाही ना? अशी चर्चाही रंगू लागली आहे.
यापूर्वीही घडलेले वाद-
लॉकडाऊन काळात मंदिर उघडण्यावरून वाद
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील मंदिरे बंद होती. ती भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केली होती. याचवेळी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्वाच्या मुद्द्याची आठवण करुन देत मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. त्यावर ठाकरे यांनी देखील राज्यपालांना आपल्या ठाकरी शैलीत प्रत्युत्तर दिले होते.
थेट सरपंचपद निवडीच्या निर्णय बदलास विरोध
जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने रद्द केला होता. त्यानंतर पूर्वीप्रमाणेच सरपंच निवडण्यासाठी अध्यादेश काढावा लागणार होता. त्यासाठी ठाकरे सरकारने केलेली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फेटाळली होती. अध्यादेशापेक्षा विधीमंडळात ठराव मांडावा असा सल्ला कोश्यारींनी दिला होता.
शरद पवार आणि राज्यपाल-
राज्यपाल कोश्यारी यांनी शरद पवार यांना कार्यअहवाल पाठवला होता. त्यावर शरद पवार यांनी राज्यपाल यांना खोचक टोमणे मारले होते. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररूप कॅफी टेबल बुक प्राप्त झाले. वास्तविक भारतीय संविधानात जनराज्यपाल असा कुठेही नामोल्लेख आढळत नाही. तरी देखील राज्य शासनाकडून अशा शीर्षकाचे सुबक छपाई असलेले, एका वर्षाच्या मर्यादीत कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध काॅफी टेबल बुक मला पाठवण्यात आले याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. असा टोला लगावला होता.
आजचा पालघर दौऱ्यात भाजपच्या बालेकिल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या भागातील न्याहाळे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत जामसर वापर पाडा व खडखड धरणाला भेट देणार आहेत. याचबरोबरीने ते शिरपामाळ या पर्यटनाला भेट देऊन पर्यटन स्थळाच्या विकासात्मक बाबींसह जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यांची यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवड केली आहे.
या गटात असलेल्या बारा ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतींची सत्ता भाजपकडे आहे. त्यामुळे एकंदरीत हा पूर्ण गण भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून राखून ठेवला आहे. त्यामुळे भाजपचा गड फोडण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या गणामध्ये दाखल झाले का? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. त्यामुळे या दौऱ्यात मुख्यमंत्री पालघर जिल्ह्यासाठी काही घोषणा करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.