मुंबई -राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने मोफत लसीकरण आणि लॉकडाऊन वाढविण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मंत्री उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण कमी करण्यासाठी २२ एप्रिलपासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत संचारबंदी लागू केली. १ मेपर्यंत राज्यात कठोर संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्व सामान्यांना घराबाहेर पडण्यासही बंदी घातली आहे. मुंबई, ठाणे, पुणे भागात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण मोहिम देखील वेगाने सुरु आहे. गेल्या दोन दिवसांत येथील रुग्णसंख्या घटली आहे. परंतु, विदर्भ, मराठवाडा, नाशिक या भागातील आणि इतर जिल्ह्यातील परिस्थिती बिकट आहे. येथे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
मोफत लसकरणावर शिक्कामोर्तब?
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लस मोफत देण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दारिद्रय रेषेखालील लोकांना मोफत लस द्यावी, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही आहे. तर सरसकट लसीकरण मोफत व्हावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यासंदर्भात काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरण प्रस्तावावर सही केल्याचे सांगितले.