मुंबई- महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे काम प्रचंड आहे. हे काम ज्या ठिकाणाहून झाले ते बाबासाहेबांचे मुंबईमधील घर राष्ट्रीय स्मारक करू, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर ठाकरे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यापाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी मुंबई पोलिसांकडून शासकीय सलामी देण्यात आली.
बाबासाहेबांचे मुंबईमधील घर राष्ट्रीय स्मारक करणार - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असे मत महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी देखील आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन केले. अडीच हजार वर्षांनंतरही ज्या प्रमाणे भगवान बुद्धाचे नाव अजरामर झाले त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेबांचे नाव पुढच्या अडीच हजार वर्षांनंतरही घेतले जाईल. बाबासाहेबांमुळे आज देश एक आहे. गरीब आणि तळागाळातील लोकांना त्यांनी हक्क मिळवून दिला आहे. बाबासाहेबांच्या आदर्शावर चालून गरीब आणि तळागाळातील लोकांचा विकास होऊ शकतो, असे मत राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.