मुंबई- परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी शिवसेनेच्या नेत्याचा संबंध असल्याचे पुढे येत असतानाच, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड यांचे नाव जाहीर करत कारवाईची मागणी केली. तसेच राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
याबरोबर या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून शिवसेना मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले जात असल्याचे समोर येताच, मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील शुक्रवारी रात्री या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणी कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत.
काय आहे प्रकरण-
पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती.
फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी-