मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्यात आली होती. मात्र, मंदिरे उघडण्यासाठी भाजपाकडून आंदोलने करण्यात आली. राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हिंदुत्वावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भाजपा आणि राज्यपाल दोघेही 'शिवसेनेने हिंदुत्व सोडले', असा आरोप करत होते. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीतून दिले. ते म्हणाले, हिंदुत्व सोडायला ते काही धोतर आहे का? हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट आपण सोडू शकत नाही, असेही ते म्हणाले.
हिंदुत्व म्हणजे काय?
हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसेच, त्याने कोरोना जात नाही हे सिद्ध झालंय, अस टोलाही त्यांनी लगावला. कोणत्याही धर्माच्या आडून राजकारण करू नका आणि आम्हाला हिंदुत्व शिकवायच्या भानगडीत पडू नका, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपाला सुनावले.