मुंबई - राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी नव्या तारखा दिल्या जात आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच आम्ही तुमच्यासारखे सत्तेच्या ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाहीत, अशी टीकाही ठाकरे यांनी भाजपावर केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात संपन्न झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपाचा भरपूर समाचार घेतला.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात संबोधित करताना. ते म्हणाले, सत्तेत आल्यापासून आमच्यावर आरोप केले जात आहेत. खोटेनाटे आरोप करताना शिवसेना गप्प कशी? असे विचारले जाते. याचे उत्तर आज मी देतो असे म्हणत काही लोक गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटून बसतात, तसे बसून असतात. आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाहीत. आमच्या वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो, हे दाखवू' असे सांगत 'हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा', असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपाला दिले.
महाराष्ट्रात गोवंश हत्या कायदा करता, मग गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला. राज्यात कोरोनासोबत इतरही संकटे आहेत. जीएसटीचा परतावा केंद्र सरकारकडून अजूनही देण्यात आलेला नाही. ३८ हजार कोटी केंद्र सरकारने दिलेले नाहीत. मग पैसे येणार कुठून? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. बिहारमध्ये निवडणुका असल्याने लस मोफत मग उर्वरित भारत बांग्लादेश आहे का? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. नुसत्या थाळ्या आणि टाळ्या पिटुन काही होत नाही, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.
तसेच "मुंबई हा पाकव्याप्त काश्मिर आहे म्हणणारा रावण आला आहे". यांना "घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचे आणि मुंबईशी नमकहरामी करायची" असे म्हणत ठाकरे यांनी अभिनेत्री कंगनावर प्रहार केला. "छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान" आहे. त्यांच्यावरच तुम्ही टीका करता हे योग्य नसल्याचे सांगत मी पोलीस दलाच्या पाठीशी असल्याचे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, रविवारी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही देखील दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाषण केले. हा कार्यक्रम नागपूर येथे झाला. त्यात त्यांनी हिंदुत्व काय आहे ते समजून सांगितले आहे. आमच्यावर हिंदुत्वाच्या नावाने प्रश्न उपस्थित करणाऱ्या आरएसएसच्या राजकीय शाखेने भागवत यांनी जे हिंदुत्व सांगितले तेच हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांचेही आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालत असल्याने आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. भाजपाने हिंदुत्व समजून घ्यावे, असे ठाकरे म्हणाले.