महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा सरकारसमोर आलाच नाही, विरोधकांनी उगाच 'एनर्जी' फुकट घालवू नये' - CM Uddhav Thackeray reaction on muslim reservation

येत्या ७ मार्चला मी अयोध्येला जाणार असून ज्यांना शक्य असेल त्यांनी अयोध्येला यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Mar 3, 2020, 1:24 PM IST

मुंबई- सरकार समोर मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा आलेलाच नाही. ज्यावेळी तो मुद्दा आपल्यासमोर येईल त्यानंतर सर्व बाबी तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येतील, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

विधान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मुस्लिमांना आरक्षण देण्याची घोषणा अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली होती. याबाबतचा अध्यादेशही लवकरच काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर धर्माच्या आधारावर शिवसेनेला मुस्लीम आरक्षण मंजूर आहे का, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली. शिवाय शिवसेना व उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका करण्यात आली.

त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुस्लीम आरक्षणाचा कोणताही विषय आपल्यासमोर आलेला नाही. तो आल्यानंतर सर्व बाबी तपासून पाहू. शिवाय आरक्षणाबाबत आपलीही भूमिका ठरलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मुस्लीम आरक्षणावरून जे विरोधक आदळआपट करून आपली 'एनर्जी' फुकट घालवत आहेत, त्यांनी ती वाचवून ठेवावी, असा टोला त्यांनी लगावला.

शेतकरी कर्जमाफी योजना लवकरच पूर्ण करू, 10 लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे, 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. दोन महिन्यात पहिली यादी जाहीर केली. दुसरी यादी पण जाहीर केली. विदर्भातील पाच लाख शेतकरी कर्जमाफीची यादी तयार आहे. मात्र गडचिरोली, अमरावती, नंदुरबारसारख्या जिल्ह्यांतील स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जाहीर केली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेंतर्गत 15 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाल्याप्रमाणे दि. 28 फेब्रुवारी रोजी 21 लाख 81 हजार कर्ज खाती क्लिअर केली आहेत. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत नाहीत, याचे समाधान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ज्यांना शक्य असेल त्यांनी अयोध्येला या

७ मार्चला मी अयोध्येला जाणार असून ज्यांना शक्य असेल त्यांनी अयोध्येला यावे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. अयोध्येच्या मुद्द्यावरून अनेकजण राजकारण करतात. पण, माझे यात कोणतेही राजकारण नाही. अयोध्याही राम जन्मभूमी आहे त्यामुळे मी दर्शनाला जाणार आहे, त्यामुळे कोणतेही राजकारण करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरेंनी केले.

सामना, शिवसेना आणि ठाकरे ही नावे कधी वेगळी होवू शकत नाही

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाची संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. सामनातील भाषा ही आमची पितृभाषा आहे. त्यामुळे सामनाची भाषा आणि दिशा बदलणार नाही. सामना, शिवसेना आणि ठाकरे ही नावे कधी वेगळी होवू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे सोपवल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

हेही वाचा -माझ्या सुनेचे चार जणांसोबत विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाणांचा खळबळजनक आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details