महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाट्यगृह भाड्याबाबत सकारात्मक विचार करणार' - Uddhav thackeray on theatre fees

कोरोनानंतरच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीतच्या मागणीवर शासन नक्की विचार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Udhhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Nov 5, 2020, 4:36 PM IST

मुंबई - राज्य सरकारने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोना अद्याप संपलेला नाही, ही बाब लक्षात घेऊन सरकारच्या नियमावलीप्रमाणे नाट्यप्रयोग करा व कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आज मराठी रंगभूमीदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी नाट्य निर्माते, कलाकार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव विजय सौरव, हेदेखील सहभागी झाले होते.

खबरदारीने पाऊल टाकणे गरजेचे -
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोनामुळे निर्मात्यांचे नुकसान झाले आहे. त्याबद्दलच त्यांच्या विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या मागणीवर शासन विचार करणार असल्याचेही सांगितले. मराठी पाऊल पडते पुढे असे आपण म्हणतो. पण आता पुढील काळात ते पाऊल अत्यंत खबरदारीने टाकणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नो मास्क नो एन्ट्री -
चित्रपट आणि थिएटर यात फरक हा आहे की इथे रिटेक नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेक अप करणे, स्टेजवर विना मास्क अभिनय करताना कलाकारांनी अंतर किती ठेवायचे, स्वच्छता कशी ठेवायची हे ठरवावे. थिएटरमध्ये सुद्धा ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याच्या स्टॉल्सवर नियम पाळले जातात की नाही याची खातरजमा करणे महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की, बऱ्याच कालावधी नंतर आपण नाट्यगृहे उघडतो आहोत. अनेक छोट्या मोठ्या समस्या येतील. आपण सर्वांनी बरोबर राहून यातून मार्ग काढू.

यावेळी आदेश बांदेकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, अमेय खोपकर, प्रदीप कबरे, बिभीषण चावरे, डॉ गणेश चंदनशिवे, प्रदीप वैद्य, प्रसाद कांबळी, यांनी चर्चेत सहभाग घेऊन काही सूचनाही केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details