महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसेच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या असे सांगितले.

ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण
ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण

By

Published : Sep 29, 2020, 7:12 PM IST

Updated : Sep 29, 2020, 7:50 PM IST

मुंबई - राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण सुमारे २४ लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसेच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या, असे सांगितले.

जिल्हा परिषदांना १ कोटी ८४ लाख कुटुंबाना भेटीचे उद्दिष्ट्य दिले आहे. त्यापैकी २४ लाख कुटुंबाच्या भेटी झाल्या असून १३ टक्के उद्दिष्ट पार पडले आहे. यात सारी आणि आयएलआयच्या १५ हजार ३९२ रुग्ण तर, कोविडचे ६ हजार ९३८ रुग्ण आढळले. सहव्याधी असलेले २ लाख ६ हजार २११ व्यक्ती आढळल्या आहेत. सर्वेक्षण झालेल्या लोकसंख्येत पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले. ठाणे भागामधून २१ टक्के, नाशिक भागामधून १० टक्के, पुणे १८ टक्के, कोल्हापूर १५ टक्के, औरंगाबाद १२ टक्के, लातूर १३ टक्के, अकोला १३ टक्के आणि नागपूर भागामधून ६ टक्के इतक्या कुटुंबांचे सर्व्हेक्षण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सारी व आयएलआय रुग्ण अधिक काटेकोरपणे शोधा, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सर्व्हेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी व इतर वरिष्ठ यंत्रणांनी तपासावे, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. ही मोहीम केवळ शासन राबवत नसून लोकांचे आहे. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. यादृष्टीने जनजागृती करा असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सुचना केल्या. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा -महाराष्ट्राची कोणी बदनामी करत असेल तर, उसळून उठले पाहिजे - संजय राऊत

Last Updated : Sep 29, 2020, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details