महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' मोहीम परिणामकारकपणे राबवा - cm uddhav thackeray

कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोहचवा. तसेच माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहीम परिणामकारकपणे राबवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

cm uddahv thackeray (file photo)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित)

By

Published : Sep 14, 2020, 9:25 PM IST

मुंबई - कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव सौरव विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक रामस्वामी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल आदी. उपस्थित होती.

राज्यातील जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत. मात्र, आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे, ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असे दिसते. 2014 मध्ये मी शिवआरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचे प्रात्यक्षिक दाखविले होते. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे, तसे झाले तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

ऑक्सिजन टँकर्सना प्रतिबंध नाही -

सध्या राज्यात 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते. मात्र, गरज 500 मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढोल काळात गरज पडू शकते, असे डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका किती उपयोग केला जात आहे, त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा. तसेच ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यावर सायरन असतील. या टँकसची वाहतूक रोखू नये, तसेच दिवसाही त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी दिली.

मोबाईल अ‌ॅपही विकसित -

या मोहिमेसाठी खास मोबाईल अ‌ॅप विकसित करण्यात आले आहे. ते सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्हे तर आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदविण्यासाठी कामी येणार आहे. यातून योग्य रीतीने आणि जलदरित्या विश्लेषण शक्य होईल, अशी माहिती रामास्वामी यांनी दिली. या मोहिमेसाठी सर्व पथकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची तसेच सर्व आवश्यक प्रसिद्धी साहित्य जिल्ह्यांना देण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. तर याप्रसंगी सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागांमध्ये या मोहिमेची कशी तयारी सुरू आहे, त्याची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details