महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्य शासनाकडून ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार; एक लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (सोमवार) एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Nov 2, 2020, 10:21 PM IST

मुंबई- राज्यात एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, एफडीआय शेरपा प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे. कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

एक लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे उद्दिष्ट -

आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरुवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल. 'युनिटी इन डायव्हर्सिटी' असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

'राज्य शासनाकडून ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार; एक लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य'
औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्याला उद्योजकांचे प्राधान्य : उद्योगमंत्री सुभाष देसाई

यूके, स्पेन, जपान, सिंगापूरसारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. डेटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क, मॅन्युफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष सहज साध्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'राज्य शासनाकडून ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार; एक लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य'
महाराष्ट्राचा औद्योगिक दर्जा उंचावणार - राज्यमंत्री अदिती तटकरे

आज झालेले सामंजस्य करार म्हणजे आमची धोरणे, कौशल्य, पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणांची आमची वचनबद्धता आणि या सगळ्यापलीकडे जागतिक स्तरावरील व्यावसायिकांशी असलेले आमचे संबंध यांचे चांगले फळ आहे. भविष्यातही महाराष्ट्र राज्यात अनेक नवीन गुंतवणूकदारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळेल, असा विश्वास उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details