महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळावी - मुख्यमंत्री ठाकरे

चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची असून स्थानिक प्रशनासाने परवानगी दिल्यानंतर चित्रीकरण करता येणार आहे. ब्रेक दि चेन मधील नव्या वर्गवारी प्रमाणे नियमांचे पालन करायचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे
चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळावी - मुख्यमंत्री ठाकरे

By

Published : Jun 6, 2021, 6:48 PM IST

मुंबई- राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची असून स्थानिक प्रशनासाने परवानगी दिल्यानंतर चित्रीकरण करता येणार आहे. ब्रेक दि चेन मधील नव्या वर्गवारी प्रमाणे नियमांचे पालन करायचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे
राज्यभरातील कोविडच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच या संवादात निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल, त्या निर्णयांना पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले आहे. राज्यातील चित्रपट आणि वाहिन्यांवरील निर्मात्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मातोश्री निवासस्थान आणि दूरदृष्टी प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.

लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्हीही नको

राज्यात गेल्या वर्षी कोविड विषाणूचा संसर्ग वाढल्याने गेल्या वर्षी प्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कोविड संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आजच्या झालेल्या बैठकीत टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, के. माधवन, मेघराज राजेभोसले, आदेश बांदेकर, प्रशांत दामले, भरत जाधव, सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, जे.डी.मजेठया, अमित बहेल, झी समूहाचे पूनित गोयंका, दीपक राजाध्यक्षसह अनेकजण सहभागी झाले होते.

'बायोबबल' वातावरणातच राहणे बंधनकारक-
कोरोनाची दुसरी लाट राज्यात पसरू लागल्याने सर्वप्रकारच्या चित्रीकरणावर महाराष्ट्र राज्य सरकारने बंदी घातली होती. संपूर्ण राज्यातील सर्वंकष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून काही नियम (एसओपी) तयार करण्यात आले आहेत. राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ज्या शहरांत, गावांत, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा रेट हा ५ ते १० टक्क्यांमध्ये आहे, तिथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे पेशंट ४० टक्क्यांहून अधिक आहे ते सर्वजण लेवल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाची चित्रीकरणे केली जाऊ शकतात. परंतु त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे. आखून दिलेल्या नियमांमध्ये सर्व चित्रीकरण करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना 'बायोबबल' वातावरणातच राहणे बंधनकारक करणे आवश्यक करावे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details