मुंबई- देशभरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे रेल्वे प्रवाशांचे धरणे आंदोलन
महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तत्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.
निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा
गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंडामधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. निधीचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.
हेही वाचा -सत्ता नाट्यानंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक, राज ठाकरे करणार मार्गदर्शन
सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही वेळा न्याय मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदवण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलिसांमुळे नागरिकांचे सण-उत्सव आनंदात पार पडतात, असेही गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सवर पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.