मुंबई- महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना ला मुलाखत दिली. ही अभिनंदन मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची सटीक उत्तरे दिली. यावेळी केंद्राने सुरू केलेल्या इडीच्या कारवाईवरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला. महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायला नसून, महाराष्ट्रात कोणी डिवचल्यास काय होतं याचे दाखले इतिहासात असल्याची मुख्यमंत्र्यांनी आठवण करून दिली. तसेच महाराष्ट्र कधी थांबला नसून थांबणारही नाही. मात्र, सूडचक्र करून महाराष्ट्राला आव्हान देणार असाल तर आमच्याकडेही सुदर्शन चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो, एवढं याद राखा, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत मालमसाला तयार आहे, पूर्ण तयार आहे -
ईडीला वेसण घालण्यावरही त्यांनी उत्तर दिले. सीबीआयचा जेव्हा दुरूपयोग करायला लागता तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही. आम्ही देतो ना नावं. आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सुडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सुडाने वागायचे असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू..
संयमी आहे नामर्द नाही -
निर्लज्जपणे तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, महाराष्ट्रातही कारवाया सुरू झाल्या आहेत. मी संयमी आहे, शांत आहे, याचा अर्थ मी काही नामर्द नाही. आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर सुरू झालेले हल्ले ही एक संस्पृती आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या मुलाबाळांवर येणार असाल, कुटुंबीयांवर येणार असाल तर तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहात, धुतले तांदूळ नाहीत, हे याद राखा. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला आहे. राजकारण राजकारणासारखे करा, सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल, तर सत्ता सदासर्वकाळ कोणाकडे राहत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
..तर हात धुवून मागे लागेल-
मुख्यमंत्री फक्त हात धुवा हे सांगण्यापलिकडे काय करताहेत, असा प्रश्न विरोधी पक्ष सातत्याने विचारत आहेत. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, की हात धुतो आहे. मात्र, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेल.
तिन्ही पक्षांचे सहकार्य-
मुख्यमंत्रीपद स्विकारल्यानंतर कोरोनाची साथ आली. या साथीत माझ्या तिन्ही पक्षांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे मी काम करू शकलो, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. सरकार अनैसर्गिक आहे, अशी टीका करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिलय, ते म्हणाले, की सरकार जर अनैतिक असते तर कोणीच शिवाजी पार्कवर फिरकले नसते. हे घडवणं, सोबत येणं कठीण होते. मात्र, सरकारस्थापनेत सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भूमिका महत्वाची होती, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.