मुंबई - मुंबईत दळणवळणाची साधने कमी पडू लागली आहेत. कोस्टल रोड प्रकल्प ( Coastal Road Project ) यावर पर्याय असून मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा ठरेल, असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray on Coastal Road Project ) यांनी व्यक्त केला. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी ह्या पहिल्या बोगद्याचे खणन, भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' ह्या टिबीएम संयंत्राच्या ( TBM plant 'Mawla ) सहाय्याने आज पूर्ण झाले.
या कामाचा 'ब्रेक थ्रू' गिरगाव चौपाटी येथे पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, ( Minister Aditya Thackeray ) महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक, पालिकेचे अधिकारी ही दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
शाब्बास मावळा -
मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी या पहिल्या २.०७० किमी लांबीच्या पहिल्या बोगद्याचे काम मावळा या टीबीएमद्वारे पूर्ण झाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत शाब्बास, मावळा.! उत्तम काम करत असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. मावळा या शब्दाला साजेसे काम यंत्र आणि ते यंत्र हाताळणारे सहकारी करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्वप्न प्रत्यक्षात आणणे कठीण असते. मुंबईकरांचे हे स्वप्नं पुर्ण करण्याच्या ध्यासाने काम करणाऱ्या टीमचा मला अभिमान आहे. या मावळ्याच्या कामाचा शुभारंभ केलेला दिवस आठवतो. तेव्हा आपण कामाचा टप्पा कधी आणि कोणत्या काळात पूर्ण करू हे सांगितले होते. तो क्षण आज पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मेहनत, चिकाटी, जिद्दीचे यश -
कोरोना संसर्ग वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे कोस्टल रोड कामाचा वेग काहीसा मंदावला होता. तरीही ऊन, वारा पावसाचा मुकाबला करत, प्रकल्प काम वेगाने पूर्ण केला आहे. हा प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा आहे. मुंबईच्या वाहतूकीला गती देणारा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. कोस्टल रोड मार्गी लावून मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीतून निश्चित कालावधी आधी प्रकल्प मार्गी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.