मुंबई- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या. प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे, त्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडलेले मुद्दे
कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर, काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे अहवाल लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन, अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी? हा प्रश्न सरकारसमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी टाळेबंदीमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. पण आता जेव्हा सर्व बाबी खुल्या झाल्या आहेत, तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. युकेने दोन महिने कडक लॉकडाऊन केला. पण, त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय, अशी माहिती बैठकीत दिली.