महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश - उद्धव ठाकरे प्रशासकीय अधिकारी लेटेस्ट बैठक

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी राज्यात २२ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील काही शहरे वगळता कोरोनाचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध वाढवल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्यांना नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.

CM Uddhav Thackeray instructions to administrative Officer
उद्धव ठाकरे प्रशासकीय अधिकारी सूचना

By

Published : Apr 30, 2021, 8:01 AM IST

मुंबई -कोरोनाची तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करावे. जिल्ह्यांनी ऑक्सिजन प्लांट्सची तात्काळ उभारणी करावी, आवश्यक औषधांचा साठा करावा. दुर्बलांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचे लाभ तत्काळ नागरिकांना द्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचनाही जिल्हा प्रशासनांना दिल्या आहेत. ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले

राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे. मात्र, त्यासाठी पुरेशा प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, पुरवठ्यानुसार त्याचे नियोजन करावे लागेल. जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये याची व्यवस्थित अंमलबजावणी करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ऑक्सिजन प्लांट उभारणीत दिरंगाई नको -

ज्या-ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यायची आहे. यासाठी कोणतेही कारण चालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवावा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठीच्या मार्गदर्शनासाठी टास्क फोर्सचे डॉक्टर कायम उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टरांना मनमोकळेपणाने विचारणे गरजेचे आहे. येणाऱ्या पावसाळा लक्षात घेता आवश्यक औषधे व संसाधनांचा साठा जिल्ह्यातील अगदी कानाकोपऱ्यात होईल, याचेही चांगले नियोजन करणे आवश्यक असल्याचे ठाकरे म्हणाले.

इतर राज्यांतून येणाऱ्या मजुरांची नोंद ठेवा -

गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत परत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल, तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र, ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर, आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत ते वाया जातील. यासाठी मजुरांची उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच माहिती घ्यावी. जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत नियोजन करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योगधंदे थांबू नयेत -

कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहतील. मात्र, त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या केली आहे का? याचे नियोजन आत्तापासून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, राहुल पंडित, डॉ, तात्याराव लहाने यांनी देखील आपले विचार मांडले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच विशेषतः रुग्णालयांतील अग्नी सुरक्षा, बांधकाम आणि विद्युत उपकरणांचे ऑडिट तात्काळ पूर्ण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास आणि प्रधान सचिव विजय सौरव यांनी देखील बैठकीत सद्यस्थितीची माहिती दिली.

हेही वाचा -महाराष्ट्रात आता 15 मेपर्यंत कडक निर्बंध

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details