महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड रुग्णांचा शोध अन् संपर्क शोधण्यावर अधिक भर द्यावा, मुख्यमंत्र्यांचे आदेश - mumbai latest news

केवळ लॉकडाऊन करणे महत्वाचे नाही तर या काळात जास्तीत जास्त कोविड रुग्ण शोधणे, त्यांचे संपर्क शोधून त्यांना वेळी अलगीकरण सुविधेत दाखल करणे हे जास्त महत्वाचे आहे, अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणानंतर ते बोलत होते.

uddhav thackeray
uddhav thackeray

By

Published : Jul 29, 2020, 9:34 PM IST

मुंबई -कोविड संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्या. ते म्हणाले की, मागील आठवड्यात मुंबईतील वॉर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील आपण कुठेही गाफील न राहता संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध राहण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. केवळ लॉकडाऊन करणे महत्त्वाचे नाही तर रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच त्यांना वेळीच अलगीकरण सुविधेमध्ये दाखल करणे, योग्य ते उपचार तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे. सर्व पालिकांनी या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करावी. पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर नंतर बंद करण्याचे केंद्रांने सांगितले आहे. मात्र, आपण पंतप्रधानांना हा पुरवठा पुढील काळात देखील सुरु ठेवावा, अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधील मृत्युदर आता 3.62 टक्के इतका कमी झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 27 दिवसांवर गेला आहे. मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवस झाला आहे. दर 10 लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे, मुंबई आणि पुणे या भागातील असून कल्याण-डोंबिवली महापालिका, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई या पालिकांमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

आज (दि. 29 जुलै) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10 वी निकाल 95.30 टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.20 टक्क्यांची वाढ आहे, असे सांगितले. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत चांगला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. कोरोना परिस्थितीतही प्रयत्नपूर्वक हा निकाल दिलेल्या वेळेत लावल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लवकरच बैठक

गेल्या तीन ते चार महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अडचणी येत असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चेदरम्यान सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच या संदर्भात बैठक घेऊन यावर मार्ग काढणार असल्याचे सांगितले.

वाढीव वीज बिलांबाबत पुढील बैठकीत प्रस्ताव आणणार

वाढीव वीज बिलांबाबत आज (दि. 29 जुलै) बैठक घेण्यात आली असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लाखो घरगुती ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सहकार व पणन मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना आज मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेब पाटील यांना उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details