मुंबई- महाराष्ट्रात आज सकाळपर्यंत साधारण 33 हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. एकट्या मुंबईत 19 हजार जणांच्या चाचण्या झाल्या, त्यापैकी 1 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण, यातून एक दिलासाजनक माहिती अशी आहे की, यापैकी किमान 65 ते 70 टक्के लोकांमध्ये सौम्य ते अती सौम्य लक्षणे दिसून आले आहेत. यामुळे आपण त्यांचा इलाज करून ठणठणीत करू शकतो, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले.
यावेळी त्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणाही केली. ते पुढे म्हणाले, आपण समोरुन रुग्ण येण्याची वाट पाहत नाही. महापालिकेकडून शोधमोहीम राबवून तपासणी करुन घेत आहोत. यामुळे प्रसार वाढण्यापूर्वीच आपण रुग्णांपर्यंत पोहोचत आहोत.