मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्यवसाय काय? त्यांची संपत्ती किती? याविषयी विरोधकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. आता याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली असून ठाकरे यांच्या नावे 143 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेची निवडणूक लढवण्यासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ठाकरे यांनी मालमत्तेविषयी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वेतन, लाभांश आणि भांडवली नफा हे उत्पन्नाचे साधन दर्शवले असून त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी व्यावसायिक भागीदारी, विविध मालमत्तेचे भाडे असे उत्पन्नाचे स्त्रोत नमूद केले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेत तीन बंगल्याचा समावेश आहे. तर कर्जत येथे त्यांच्या नावे एक फार्म हाऊस आहे. ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नसून त्यांच्या नावे 4 कोटींचे कर्ज देखील आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात त्यांची आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची गुंतवणूक आहे. रायगड जिल्ह्यातील भिलावले आणि कोर्लई येथे एकूण 13 कोटींचे बाजारमूल्य असलेली 10 एकर शेतजमीन आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे 76 हजार 922 रुपयांची तर पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 89 हजार 679 रुपयांची रोख रक्कम आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहा बँक खात्यांचे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या पाच बँक खात्यांचे विवरण प्रतिज्ञापत्रात दिले आहे.