मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाला मुलाखत दिली. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आपला पहिला अनुभव कथन केला. तसेच मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेण्यापूर्वी आणि नंतर घडलेल्या सर्व घडामोडीवर त्यांनी चर्चा केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. ज्याठिकाणी कॅबिनेटची बैठक घेतली जाते तो एक मोठा हॉल आहे. पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत एकूण ७ मंत्री आणि काही प्रशासकीय अधिकारी होते. यावेळी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, 'राजभाषा कोशात काही सरकारी मराठी शब्द आहे. आता तेच सरकारी शब्द समजून घेत आहे. ते आता हळुहळु अंगवळणी पडत आहेत', असेही मुख्यमंत्री म्हणाले. सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. कारण मी सत्ता जवळून पाहिली आहे. मुळात आपल्याला काय करायचे आहे? हे स्पष्ट असेल, तर अडथळे येत नाहीत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - '...तर मी मुख्यमंत्री झालो नसतो', विधान परिषदेवर जाण्याचेही दिले संकेत
मंत्रालयातील आपल्या पहिल्या दिवसाचा अनुभव देखील त्यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात गेल्यावर छत्रपतींना आणि बाबासाहेबांना वंदन केले. त्यानंतर कार्यालयात गेलो. त्यावेळी जे स्वागत करण्यात आले ती आपल्या माणसाचे स्वागत करत आहोत, अशी भावना होती. तसेच माझे स्वागत करणाऱ्या त्या व्यक्तींमध्ये मी बाळासाहेबांना पाहतो. त्या लोकांच्या रुपाने ते माझ्या सतत सोबत असतात.