मुंबई- राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना आम्ही थांबवणार नाही, असे स्पष्ट करतानाच उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात सांगितले.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र, उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.