मुंबई - राज्यातील विशेषत: मुंबई-पुण्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणे याला प्राधान्य असून यादृष्टीने केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले. आज मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पथकाने राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चाचण्या करीत आहे, त्यावर समाधान व्यक्त केले.
सध्या राज्यात रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी सुमारे ७ दिवसांचा आहे आणि तो १० दिवसांपेक्षा जास्त करण्याचे सध्या ठरविले आहे. मृत्यू झालेल्यांत ७८.९ टक्के रुग्णांमध्ये इतरही आजार होते तसेच मरण पावलेले रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत, असे लक्षात आले आहे.
अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आले आहे, तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय पथक पुणे आणि परिसराचा दौरा करीत आहे.
वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेण्याशिवाय या पथकांनी लॉकडाऊन उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, सामाजिक अंतराच्या निकषाचं पालन, आरोग्य विषयक सुविधांची सज्जता, आरोग्य व्यावसायिकांची सुरक्षा आणि मदत शिबिरांमधली मजुरांची स्थिती याचा आढावा घेतला तसेच सूचनाही केल्या.
पीपीई कीट्सची आवश्यकता पुढील काळात आणखी लागू शकते. त्यामुळे आता अशी कीट्स केंद्राने तातडीने उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. स्थानिकरित्या देखील काही कंपन्या असे कीट्स उत्पादित करीत आहेत. मात्र, केंद्राने याबाबतीत त्वरित मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय पथकाने रुग्णालयांतील सुविधा, क्वारंटाईन पद्धती, चाचण्या व या अनुषंगाने दिलेल्या सूचनांवर मुंबई आणि पुणे येथील प्रशासनाने त्वरित कार्यवाही सुरू करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पथकाच्या सूचना -
संस्थात्मक क्वारंटाईन वाढविणे, अधिक चाचण्या करणे, विशेषत: झोपडपट्टीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेणे, असे प्रसाधनगृह वापरणाऱ्या धारावीसारख्या भागांमध्ये त्याच परिसरात क्वारंटाईन न करता परिसराबाहेर दूर लोकांना क्वारंटाईन करणे, कोव्हिड आणि नॉन कोव्हिड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी, तसेच लवकरात लवकर खासगी दवाखाने, नर्सिंग होम्स सुरू करणे जेणेकरून कोव्हिडव्यतिरिक्त रुग्णांनादेखील उपचार मिळावेव, अशा सुचना मनोज जोशी यांनी केल्या.
इतर रुग्णांचे हाल नकोत- मुख्यमंत्री
पथकाच्या सूचनेला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत तातडीने निर्देश दिले. कोरोना नसलेल्या इतर आजारांच्या रुग्णांचे हाल होत आहेत अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे तातडीने महापालिकेने अशा सर्व कोरोना उपचार करणाऱ्या आणि कोरोना नसलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नॉन कोव्हिड दवाखाने, रुग्णालये आणि फिव्हर क्लिनिक्सची माहिती सर्वसामान्यांना द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुंबई पालिकेला दिले.
नर्सिंग होम्स बंद ठेवू नयेत -
खासगी क्लिनिक्स, नर्सिंग होम्समधील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना आपल्या सुरक्षेची काळजी आहे हे मी समजू शकतो पण अशा परिस्थितीत सर्वसामान्य रुग्ण, डायलेसिसचे रुग्ण, ह्रदयविकार रुग्ण , लहान मुलांचे , वयोवृद्ध लोकांचे आजार यावर उपचार कोण करणार. सर्व नर्सिंग होम्स यांनी आपले दवाखाने उघडून या रुग्णांची सेवा केली पाहिजे. सरकार त्यांना पीपीई कीट किंवा इतर सामग्री उपलब्ध होताच निश्चितपणे पुरवेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. प्लाझ्मा थेरपीलादेखील लवकरात लवकर मान्यता मिळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात केरळपेक्षा ६ पट जास्त चाचण्या -
यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी महाराष्ट्रात केरळ व इतर राज्यांपेक्षा ६ पट जास्त चाचण्या होत असल्याची माहिती दिली. पीपीई कीट्स नेमके कुणी वापरावे याबाबतीतही केंद्राने धोरण आखून द्यावे असेही ते म्हणाले.
कंटेनमेंट झोन्स कमी होत आहेत -
केंद्रीय पथकाच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - मुंंबई संचारबंदी
आज मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पथकाने राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चाचण्या करीत आहे, त्यावर समाधान व्यक्त केले.
मुंबईत ५५ हजार चाचण्या झाल्या असून आज ४२७० चाचण्या दर १० लाख लोकांमागे झाल्या आहेत. ते म्हणाले की, सध्या मुंबईतल्या ३२६ ठिकाणी कंटेनमेंट झोन्स असून ४४७ झोन्स इमारतींच्या परिसरात आहेत. इमारतीत असलेले झोन्स झपाट्याने कमी होत आहेत ही समाधानाची बाब आहे, असे मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर होमगार्ड्सची मदतदेखील आम्ही घेतली असून कंटेनमेंट धोरण अधिक प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी नियोजन केले आहे. आजच्या दिवशी ११८० चाचण्या धारावीत केल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे येथील केंद्रीय पथकानेही ससून रुग्णालयात अधिक सुविधा मिळणे तसेच वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.