मुंबई - एकीकडे शिवसेना-भाजप युतीच्या वावड्या उठल्या असताना दुसरीकडे आम्ही ३० वर्षे एकत्र राहूनही काहीच झाले नाही, तर आता काय होणार? असे स्पष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे युतीची शक्यता फेटाळून लावली. तसेच एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी असल्याने आम्ही बाहेरच पडू शकणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावले. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन संपल्यावर विधान भवनातील पत्रकार परिषदेत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यात सत्तापालटच्या उलटसुलट चर्चा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यापासून राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत “आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हते. मात्र, वैचारिक मतभेद निर्माण झाले होते, स्पष्ट केले होते. विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या वक्तव्याने राज्यात सत्ता पालटच्या उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना मुख्यमंत्री ठाकरेंच्या वक्तव्याने पूर्णविराम मिळाला आहे.