मुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय गाफील राहू नका, यापेक्षा मोठे संकट येऊ शकेल. यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. अजूनही आपल्याकडे कोरोनाची लस आली नाही. त्यामुळे उद्या मंदिर उघडा म्हणून घंटा वाजवू नका, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे चिमटे काढले. विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठीचे निवेदन केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडून कोरोनाच्या काळात मंदिर उघडा, अशी मागणी जात असल्याने त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन करताना विरोधकांची चिमटे काढले.
कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर असून आपण सर्वजण विचित्र परिस्थितीत जगत आहोत. अशा काळात हे संकट परतवून लावण्यासाठी आपण स्वयंशिस्त पाळावी, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाची घोषणा केली. हा कार्यक्रम नसून ही चळवळ जनतेची चळवळ असली पाहिजे. ही चळवळ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, गाव, पाड्यात जाऊन यासाठी ही मोहीम राबविणार असून यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल. या संकटातून मुक्त होण्यासाठी सगळ्यांनी मला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विरोधकांनी राज्यात कोरोनाच्या संदर्भात सरकारकडून हलगर्जीपणा होत असल्याचे अनेक आरोप केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, संकटाच्या काळात आमचे हक्काचे जीएसटीचे २२ हजार कोटी येणे आहेत. ते आम्हाला केंद्र सरकार देत नाही. उलट कर्ज काढा म्हणत आहेत, सेवा कराची मांडणी चुकीची झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांना प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. आज आपल्याकडे आपत्ती आणि हे जे संकट आले आहे, त्यावर आपण एक एक टप्प्याने लॉकडाऊन करत होतो. पण केंद्राने सगळे एकाच वेळी केले आणि आता सगळ्या नाड्या आवळून टाकायच्या आणि म्हणायचे आता तुम्ही सर्व करा. असे सांगत केंद्र सरकारवर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला.