मुंबई -100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने असे काही तरी करून दाखवा की जे भविष्यात देखील त्याची दखल घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नायर रुग्णालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, 100 वर्ष झाल्याच्या निमित्ताने पालिका आणि राज्य सरकारच्या वतीने नायर रुग्णालयाला 100 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी जाहीर केले.
मुख्यमंत्री आपल्या संबोधनात काय म्हणाले?
मुंबईत महापूर आल्यानंतर कस्तुरबा येथे आपण पहिली लॅब सुरू केली आणि आता 600 लॅब आपल्याकडे आहे. आपण एखाद्याला शतायुषी होतो, असा आशीर्वाद देतो पण या रुग्णालयाने तो आशीर्वाद पूर्ण केला. मंचावर आमचीच गर्दी जास्त, अशी कबुलीही मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली.
सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केलं आहे. रुग्णालये हे मंदिरासारखं आहे आणि यातील डॉक्टर हे देव आहेत. कौतुकाचे खरे मानकरी हे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पालिका आयुक्त यांनी पदभार स्वीकारत लगेच धारावीत गेले आणि जे घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. कोरोना काळात आपण काय केलं आणि काय करायला नको, हे सगळं आपण लिहून ठेवायला हवं. जेव्हा नायरला 200 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा याची नोंद होईल. नायर ही 100 वर्षांची तरुण संस्था आहे. काळानुसार यात बदल होत गेला आहे. ही निर्जीव इमारत नसून सगळ्या कर्मचाऱ्यांनी जीव ओतून ती सजीव केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच पालिका आणि सरकार हे माझेच 2 खिसे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -राज्यपाल लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवताहेत; मंत्री जयंत पाटलांचा राज्यपालांवर निशाणा