मुंबई- कोरोना ( Corona ) या विषाणूची तीव्रता कमी होत असताना आता दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या "ओमिक्रोन" ( Omicron Variant) हा नवीन विषाणू सध्या जगभर चर्चेचा विषय झालेला आहे. या विषाणूची तीव्रता पाहता राज्यांमध्येही नियमांचे कडेकोट पालन करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी दिल्या आहेत. आज (दि. 28) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सचिव, कोविड टास्क फोर्स यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.
नियमांचे काटेकोर पालन करा...
टाळेबंदी ( Lockdown ) नको असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करायला लावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आफ्रिकी देशांमध्ये सापडलेला ओमिक्रोन विषाणू हा धोकादायक असल्याने राज्याने केंद्राची वाट न बघता शक्य होईल ते सर्व करा, असे म्हणत उपाययोजनांसाठी ताबडतोब कामाला लागा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आफ्रिकी देशातून येणाऱ्या येणाऱ्यांवर नजर...
कोरोनाचा हा नवीन विषाणू वेगाने पसरणारा असल्यामुळे आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान सेवा बंद करण्यात यावी, अशी मागणीही केंद्राकडे करण्यात येणार आहे. तसेच राज्यात 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांबाबतही निर्णय घेणे बैठकीत अपेक्षित होते. पण, तो निर्णय आज झालेला नाही. याबाबत उद्या (दि. 29) निर्णय घेण्याचे संकेत भेटत आहेत. आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या या प्रकारामुळे मुंबईतही चिंता वाढली आहे. खबरदारी म्हणून आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांचे वर्गीकरण करण्याचा विचार महापालिका करत असून आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (Genome Sequencing Test ) करण्यावर पालिका भर देणार असल्याचेही म्हटले जात आहे. उद्या दुपारी एक वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक ( Cabinet Meeting ) होत असून या बैठकीमध्ये या विषयांसंदर्भात व उपाय योजना संदर्भातही सविस्तर माहिती घेतली जाणार आहे.
हे ही वाचा -Omicron : राज्यात एकही रुग्ण नाही, आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदीची मागणी तर परदेशी पर्यटकांची होणार जिनोम टेस्ट