मुंबई - तीन मेनंतर राज्यातील काही भागात अधिक मोकळीक दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांनी आज जनते बरोबर फेसबूकच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मात्र निर्बंध शिथील करत असताना विनाकारण गर्दी केल्याचे निदर्शनास आल्यास निर्बंध पुन्हा लागू केले जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत त्यांनी आज जनते बरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, लॉकडाऊन म्हणजे तुमच्यावर लादण्यात आलेली बंधने नसून ते कोरोनासाठी एक गतीरोधक आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णाचा गुणाकार झाला नाही. त्यामुळे लॉकडाऊन तुमच्या आमच्या सर्वांच्या हितासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन लाख जणांची तपासणी
कोरोनासाठी तपासणी करण्यासाठी पल्स ऑक्सीमिटरने तपासणीची सुरुवात करण्यात आली आहे. या पल्स ऑक्सीमिटरद्वारे आतापर्यंत सुमारे दोन लाख जणांची तपासणी करण्यात आली आहे. या पल्स ऑक्सीमिटरमध्ये रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण व इतर काही आजा असेल तर त्याचा तपास लागतो. यातील ज्यांना ज्या प्रकारच्या उपचाराची गरज आहे त्यांना त्या प्रकारचे उपचार देण्यात येते. ही तपासणी मुख्यत्वे झोपडपट्टी, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
दहा हजार कोव्हीड योद्धे आहेत तयार
कोरोना विरोधातील लढ्यासाठी आवाहन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातून आतापर्यंत 10 हजार योद्धे तयार झाले आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे याही कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -जोगेश्वरीतील 11 रुग्ण कोरोनामुक्त, नागरिकांच्या स्वागताने झाले भावूक