मुंबई- प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, राजीनामा घेणे किंवा गुन्हा दाखल करणे यातून काही साध्य होत नाही. गुन्हा घडल्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे, त्यातून सत्य बाहेर येईल, त्यातील आरोपीला क्षमा होणार नाही. चौकशी झाल्यानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे, त्याबरोबर पत्रसुद्धा मिळाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
पूजाच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिले आहे. मुलीच्या मृत्यूसंदर्भात उलट-सुलट बातम्या येत आहेत. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी केली नाही. परंतु, संशयावरून कुणावरही आरोप करू नयेत. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. त्यांचे काम मोठे आहे. त्यांच्या नावाने राजकारण केले जात आहे. यासारखे दुर्दैव नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास होईल. गुन्हेगार कुणीही असला तरी त्याला शिक्षा होणारच, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.