मुंबई - विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोना हाताळण्यापासून राज्यपालांचा अवमान, राज्यातील कायदा सुव्यवस्था आदी प्रकरणावरून त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. त्यानंतर आता अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात विरोधकांच्या सगळ्या मुद्द्यांवर उत्तरे देणार आहेत.
अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार; मुख्यमंत्री देणार विरोधकांना उत्तरे
राज्यपालांचा झालेला अपमान, आरोग्य खात्याच्या परीक्षामध्ये उडालेला गोंधळ, शेतकरी वीज बील माफी, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बोजवारा, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा दिलेल्या सेलिब्रिटींची लावलेली चौकशी आदी मुद्यांवरून फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली होती. या सर्व मुद्द्यांना मुख्यमंत्री आज सभागृहात उत्तर देणार आहेत.
फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार संपूर्ण अपयशी ठरले आहे. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नाही. कोरोना बाधितांचे आणि मृतांची संख्या यामुळेच वाढली. वैद्यकीय उपकरणे, पीपीई किटसह अन्य वस्तू खरेदी आणि जम्बो रुग्णालय उभारण्यात कोट्यवधींचा घोटाळा झाला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला. तसेच राज्यपालांचा झालेला अपमान, आरोग्य खात्याच्या परीक्षामध्ये उडालेला गोंधळ, शेतकरी वीज बील माफी, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बोजवारा, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा दिलेल्या सेलिब्रिटींची लावलेली चौकशी आदी मुद्यांवरून फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी केलेल्या या आरोप आणि टीकेवर संबंधित नेत्यांनी सभागृहात त्या त्यावेळी स्पष्टीकरण दिले आहेच. मात्र, आज राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फडणवीसांसह विरोधकांच्या सर्व मुद्द्यांवर बोलणार आहेत. त्यामुळे विधानसभेचा आजचा तिसरा दिवसही गाजणार असल्याचे दिसते.
विरोधकांचा गोंधळ
कोरोना काळात ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनात ठिय्या मांडल्याने गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजप आक्रमक झाले. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.