मुंबई - राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह अनेक गावांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दरेकर, प्राध्यापक राम शिंदे, हे आज विविध ठिकाणच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली. तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्वच नेत्यांच्या पाहणी दौऱ्याचा ईटीव्हीने घेतलेला आढावा..
शरद पवारांसह मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांचा विविध ठिकाणी पाहणी दौरा महाराष्ट्रावर ऐतिहासिक संकट, मदतीसाठी कर्ज काढू - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील काही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी पवार म्हणाले, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्याचा, पंढरपूर परिसराचा भाग या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर भागात असंच चित्र आहे. उस्मानाबाद हा सबंध जिल्हाच संकटात असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रवर आलेले हे संकट ऐतिहासिक असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
रस्ते दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घ्यावं लागेल. तसेच पाटबंधारे विभागाच्या कालव्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आहे तो पुरेसा होणार नाही. या संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतंत्र निर्णय राज्य व केंद्र सरकारला घ्यावा लागेल, असेही पवार म्हणाले.
त्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या आग्रहाची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. नेहमीच्या नियमावलींच्या चौकटीतून बाहेर जाऊन आपण पावलं टाकल्याशिवाय आपण या संकटातून लोकांना बाहेर काढू शकू असं वाटत नसल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले
हे शेतकऱ्यांचे सरकार, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री ठाकरे
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तेथील नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून धीर दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे शेतकऱ्याचे सरकार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिले.
शरद पवारांसह मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांचा विविध ठिकाणी पाहणी दौरा जबाबदारी झटकू नका, राज्यसरकार मदत करणार की नाही;- फडवीस
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बारमतीचा पाहणी दौरा केला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, की ही राजकारणाची वेळ नाही. केंद्र सरकार तर मदत देईलच, पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही? जबाबदारी झटकून कसे चालेल? असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला केला. बारामतीतील उंडवडी येथील शेताची पाहणी करून त्यांनी त्यांच्या पाहणीचा दौरा सुरू केला आहे. ते सध्या बिहार निवडणुकीचे प्रभारी असून राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी,नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना भेटी देत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर, राहुल कुल, खासदार निंबाळकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.
ओला दुष्काळ जाहीर करा; अन्यथा आंदोलन - राम शिंदे
राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी केली. शिंदे यांनी आज कर्जत जामखेड मतदार संघातील राशीन गटांमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. तसेत ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत न दिल्यास भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील शिंदे यांनी दिला.