मुंबई - काही जण म्हणतात पॅकेज का नाही दिले? मात्र, आतापर्यंत किती पॅकेज दिली? त्यांचे काय झाले? पॅकेज दिले जाईलच, पण अन्न मिळणे, उपचार मिळणे हे पॅकेजपेक्षाही मोठी गोष्ट आहे, असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
रेशनकार्ड नसलेल्यांनाही धान्य देण्यात आले. फक्त पॅकेज देऊन भागणार नाही. जाहीरात करण्यापेक्षा काम करणे महत्त्वाचे आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दररोज 10 लाख लोकांना जेवण देण्यात आले. 5 ते 23 मे दरम्यान 481 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. या व्यवस्थेवर 85 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत 6 ते 7 लाख मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या 32 हजार फेऱ्या झाल्या असून 3 लाख 80 हजार जणांना सोडण्यात आले आहे. यात देखील 75 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मग अजून कोणते पॅकेज हवे, असा सवालही त्यांनी विरोधकांना केला. सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या व्हीसीमध्ये येत्या 15 दिवसांत आपल्या देशाचे चित्र स्पष्ट होईल, असे मी सांगितले.
शिक्षणाच्या बाबतीतही विचार सुरू आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या बाबतीतही निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल. अर्थव्यवस्थेबद्दल ते म्हणाले, आतापर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत. रोजगार हमी योजनेमार्फतही काम सुरू करण्यात असल्याची माहिती दिली. हळूहळू काही भागांमध्ये मुभा दिल्या जात आहेत. सहा लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत. चित्रपट विभागाच्या लोकांचीही चर्चा सुरू आहे. त्यावर चित्रिकरणाला परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. शेतकऱ्याला बांधावरच बियाणे, खते कशी उपलब्ध करून देता येतील, याचाही विचार सुरू आहे. जगात कोणतेही संकट आले तरी, शेती ही सुरू राहिलीच पाहिजे. आजपर्यंत 75 ते 80 टक्के कापूस खरेदी सुरू आहे. एकंदरित सर्वच बाबींवर विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
काही ठिकाणी आरोग्य सुविधा वाढवून देत आहेत. टेस्टिंग लॅब वाढवून देण्यात येत आहेत. धान्य खरेदीबाबतही विचार सुरू आहे. सर्व शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संकटाचा काळ आहे. कोणीही राजकारण करू नये. कोणी केले तरी आम्ही करणार नाही. कारण आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे, आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. आम्ही राजकारण करणार नाही, असेही त्यांनी सुनावले.
कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याच्यावर मात करण्यासाठी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात गुणाकार करायला लागला आहे. मात्र, कोणीही काळजी करू नये, महाराष्ट्र सरकार तुमची जबाबदारी घेत आहे. लॉकडाऊनबाबत ते म्हणाले, हळूहळू ज्याप्रकारे आपण बंद केले तसेच हळूहळू सर्व सुरू करू, असे सांगून ते म्हणाले, लॉकडाऊन हा शब्द आता बाजूला करा. हळूहळू सर्व सुरळीत करणार मात्र जनतेने खबरदारी घेतली नाही तर पुन्हा बंद करणार, असेही ते म्हणाले. आणखी काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. प्रत्येकांनी घरीच राहून आपल्या दैवताला निरोगी आयुष्याचे दिवस मिळो, यासाठी प्रार्थना करा, असे आवाहनही त्यांनी केले.
योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.कोरोना हा आपल्याला चांगल्या गोष्टीही शिकवून जात आहे. आरोग्याची काळजी कशी घ्यायची, हे कोरोना आपल्याला शिकवू जात आहे. आपण कोरोनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया, असे ते म्हणाले. आगामी काळात 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध करून देण्यात येईल. जास्तीत जास्त रूग्णांना व्हेंटिलेटर पेक्षा ऑक्सिजनची गरज असते. तीदेखील व्यवस्था करण्यात येत आहे. आता पुन्हा रक्तदान करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.होळीनंतर कोरोनाची बोंबाबोंब सुरू झाली. मात्र, लॉकडाऊन काळातही सर्वांनी नियम पाळून सण साजरे केले. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो. ईद साजरी करताना रस्त्यावर न येता घरातल्या घरात ईद साजरा करा आणि हे संकट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना करा, असेही आवाहन केले.
केंद्र सरकारने एप्रिलपासून मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सव्वा ते दीड लाख इतके रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आजपर्यंत 33 हजार 786 या पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यात मात्र पहिल्यादिवसापासून आतापर्यंतचे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तर,13 हजाराच्यावर रूग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. सव्वा लाख रूग्णांची शक्यता व्यक्त केली जात असताना, आज 33 हजारांवर आकडा आहे. हे सर्व तुम्हा सर्वांमुळे शक्य झाले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी धन्यवादही दिले.
आगामी काळात पावसाळा सुरू होणार आहे. साथीचे रोग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताप येत असेल, थकवा येत असेल, वास कळत नसेल तर अशा परिस्थितीत कुठलाही हलगर्जीपणा करू नका. लवकरात लवकर डॉक्टरकडे जा. सरकारकडूनही आतापर्यंत लाखो लोकांची चाचणी करण्यात आल्याचीही त्यांनी माहिती दिली. कोविड आणि नॉन कोविड असा भाग करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.