मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी कशी सुरू आहे? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगावं, असे आवाहन भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली.
काय म्हणाले मंत्री राठोड?
वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाणच्या मृत्यूवर संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. आम्ही चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. मात्र या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न या प्रकरणात झाल्याचे आपण पाहिले आहे. याविषयी सोशल मीडियातून पसरणाऱ्या बाबी तथ्यहीन आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले. माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या समाजाची बदनामी करू नका ही विनंती करतो. माझ्या समाजाचे माझ्यावर प्रेम आहे. अनेक लोक मला भेटतात. ते माझ्यासोबत फोटो काढतात. कृपया मला राँगबॉक्समध्ये उभे करू नका असेही राठोड यावेळी म्हणाले.