मुंबई:महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने अनुयायी खारघर येथील उघड्या मैदानात चार तासांपेक्षा अधिक वेळ बसून होते. ४२ अंश सेल्सियस तापमानात आणि रखरखत्या उन्हात झालेल्या या कार्यक्रमात शेकडो अनुयायांना उष्माघाताचा त्रास जाणवला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कार्यक्रम ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे शेड किंवा छप्पर उपलब्ध नव्हते. तसेच पिण्याचे पाणी सुद्धा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेकांना भोवळ येऊन ते जागेवरच पडले. अशामध्ये १३ अनुयायांचा मृत्यू झाला असून शेकडो अनुयायी अजूनही उपचार घेत आहेत. एकंदरीत, या प्रकरणावरून राज्य शासनाविरुद्ध टीकेची झोड उठली असून आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
केवळ सत्तेसाठी व शक्ती प्रदर्शनासाठी:प्रीती मेनन म्हणाल्या की, महाराष्ट्रात ५० खोक्यांचे सरकार आहे आणि ते सत्तेसाठी काहीही करू शकते; परंतु सत्तेसाठी, शक्तिप्रदर्शनसाठी हे सरकार लोकांच्या जीवाची आहुती देणार ही कल्पना कोणी केली नव्हती. काल (रविवारी) महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कार्यक्रम राज्य सरकारने आयोजित केला होता. वास्तविक असे कार्यक्रम बंदिस्त सभागृहात आयोजित केले जातात; परंतु शिंदे आणि फडणवीस सरकारने याला एका राजकीय रॅलीमध्ये बदलले आणि खारघर येथे इतक्या उष्णतेच्या लाटेत भर दुपारी ही सभा घेतली. शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये निर्देश दिलेले आहेत की, उन्हाळा असतो तेव्हा सायंकाळी कार्यक्रम घेतले जावेत; परंतु राज्य शासनाने भर दुपारी उन्हात कार्यक्रम घेतला.