मुंबई - मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येतात. ग्रामीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदारांना करावा लागतो. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक देऊन केवळ मिसकॉलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी करिता वेळकाढू प्रक्रियेतून आता सहज, सोप्या आणि कमी वेळात निधी मिळेल. लाभार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
गरजूंना होणार फायदा - निरोगी आरोग्य, शारीरिक उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी शासनामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबवते. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य दिले जाते. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. विविध दुर्धर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आजवर ८ हजार रुग्णांकरीता ६० कोटी ४८ लाख इतका मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वाटप करण्यात आला. प्रति महिना दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होतात, पैकी १ हजार अर्ज मंजूर होतात. अर्ज दाखल केल्यानंतर केवळ ७ दिवसांत वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते.
लवकरच अँप बनवणार - मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येणारे बहुतांश अर्ज अपूर्ण स्वरूपात असतात. मदत करण्यास अडचणी येतात. सध्या मिसकॉल वर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी लवकरच मुख्यमंत्री सहायता निधी अर्जासाठी अॅप बनवले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि एकाच वेळी तिथे सर्व माहितीचे अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.