महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकार अडचणीत येईल अशी वक्तव्ये टाळा, मुख्यमंत्र्यांची आमदारांना तंबी - Budget session

सरकारला अडचण निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये, अशी तंबीच महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना दिली आहे. तसेच, कोणीही काहीही बोलले तरी आपले सरकार टिकणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या बैठकीत दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Feb 25, 2020, 11:07 AM IST

मुंबई- विरोधी भाजप सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असताना राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (दि. 24 फेब्रुवारी) सुरू झाले. दोन्ही सभागृहांचे कामकाज शोकप्रस्तावानंतर तहकूब करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेपर्यंत सभागृहात रोज सर्व आमदारांनी उपस्थित राहायला हवे, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच सरकारला अडचण निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये, अशी तंबीच महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना दिली आहे.

दरम्यान, नुकतेच भाजप खासदार नारायण राणे यांनी ‘हे सरकार 11 दिवसांत पडेल’, असा इशारा दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर शंका उपस्थित केले जाऊ लागली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना धीर देत हे सरकार पडणार नाही याची शाश्वती मी देतो, असे सांगितले. तसेच, कोणीही काहीही बोलले तरी आपले सरकार टिकणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या बैठकीत दिला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींचेही कौतुक केले. सोनिया गांधी या चांगल्या विचारांच्या आहेत, असे सांगत हे सरकार नक्कीच टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व आमदारांना विधानसभेत हजर रहा, चर्चेत सहभागी व्हा, आपले प्रश्न मांडा, जनतेचे प्रश्न सोडवा, लोकांना महाविकासआघाडीकडून हीच अपेक्षा असल्याचे सांगितले.

हेही वाचा -विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवारांची निवड

ABOUT THE AUTHOR

...view details