महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा समाजाप्रमाणेच लिंगायत समाजाचा प्रस्तावही मागासवर्ग आयोगाकडे; मुख्यमंत्र्यांची सूचना

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची सूचना

By

Published : Jul 22, 2019, 9:57 PM IST

मुंबई- मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा मोठा वाटा होता. आता लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, सामाजिक व आर्थिक मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग विभागाचे मंत्री संजय कुटे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, लिंगायत रेड्डी, हिंदू लिंगायत व हिंदू वीरशैव या लिंगायत समाजातीलच उपजाती आहेत. त्यांचा समावेश इतर मागास वर्गामध्ये करण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. त्यांनी तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात मागासवर्ग आयोगास विनंती केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मंगळवेढा येथे उभारण्यात येणाऱ्या जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीत तातडीने मंजुरी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्मारकामध्ये कल्याण मंडप, महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा आणि त्यांच्या चरित्रावर आधारित वाचनालय तसेच लेझर शो असणार आहेत. हे स्मारक कार्बन-न्यूट्रल असावे. यासाठी मोठी झाडे लावण्यात यावीत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तसेच सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध जिल्ह्यातील लिंगायत समाजाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

किरात समाजाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर

भोई या जातीची तत्सम जात म्हणून किरात समाजाचा समावेश आहे. मात्र, किरातऐवजी किरात किंवा किराड असा समावेश भटक्या जमाती प्रवर्गात करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भटक्या जमाती प्रवर्गात किरातऐवजी किरात-किराड असा बदल करण्याच्या मागणीसंदर्भात त्यांनी हे निर्देश विशेष मागास प्रवर्ग विभागाला दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details