मुंबई- आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) वर्षा येथील प्रांगणात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020 मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातील, पण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात सेवा करायचे ठरविले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाल्याबद्धल गुणवंतांनी आपण भारावून गेलो असून पुढील जबाबदारीची प्रेरणा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आदींची उपस्थिती होती. बाळासाहेब ठाकरे अकॅडमीचे विजय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
देशाचे नावही मोठे करा
अकादमीला 21 वर्षेही पूर्ण झाल्याबद्धल अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी या अकादमीच्या माध्यमातून पुढच्या काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन मिळेल व ते अशा स्पर्धात्मक परीक्षेत कसे उत्तीर्ण होतील ते पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्यात किंवा देशात कुठेही गेलात तरी सर्वोत्तम काम करून आपापल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नावही मोठे करा. तसेच आपल्या यशात मोठा वाटा असलेल्या आई, वडील आणि गुरूंना कधीही विसरू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शासन आणि प्रशासनात सुसंवाद नसेल तर प्रश्न उभे राहतात. मलाही प्रशासनाचा कोणताही अनुभव नव्हता. पण, मुख्यमंत्री पदाची महत्वाची जबाबदारी अंगावर पडल्यावर मीही प्रशासनातील अनेक गोष्टी शिकलो, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आमची तर नेहमीच परीक्षा