मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील वीज ग्राहकांना दोन हजार कोटीचे पॅकेज देण्यावर चर्चा होणार आहे. याच बरोबर आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण प्रश्नावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.
विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळामध्ये वीजग्राहकांना भरमसाठ बिले आल्याने राज्यभरात उद्रेक वाढला होता. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे यासंदर्भात राज्य सरकारने विचारणा केली होती. परंतु वीज नियामक आयोगाने वीजदरवाढी मध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला, त्यानंतर मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली होती.
वित्त विभागाने या प्रस्तावाला आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. परंतु आता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून या संदर्भात एक बैठक देखील पार पडली आहे. जनतेचा रोष कमी करण्यासाठी वीज बिलामध्ये दिलासा देणे आवश्यक असल्याची सरकारची सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे या संदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडतील. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.