मुंबई -धरणातून पाण्याचा विक्रमी विसर्ग झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी मदतकार्य राबवण्यात येत आहे. मात्र, आता मदतीचे निकष बदलवून वाढीप दुप्पत मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून योग्य वेळी पूरग्रस्त भागाला भेट देईन, असेही ते यावेळी म्हणाले. राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1007 मिमी असून आतापर्यंत सरासरीच्या 685 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत पूरपरिस्थिती आणि मदत कार्याची माहिती घेतली. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
कोल्हा'पूर' -
कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 22 पथके कार्यरत आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून विमानाच्या माध्यमातून पूरग्रस्तभागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूरमधील 204 गावांना पुराचा फटका बसला आहे. प्रशासनामार्फत सध्या 11 हजार नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. आता नौदलाचे बचाव पथक देखील कार्यरत असल्याचे सांगितले.
सांगली पूरस्थिती -
सांगली जिल्ह्यात सांगली, पलूस, वाळवा तालुक्यात पुराचा फटका बसला आहे. सुमारे 53 हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील नागरिकांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर येथील सुमारे 2 हजार नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पुणे पूरस्थिती -
पुणे जिल्ह्यात शहरासह 64 गावे पुराने प्रभावित झाली असून सुमारे 3 हजार 343 लोकांना मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत.
रायगड पूरस्थिती -
रायगड जिल्ह्यात 8 तालुके बाधीत असून सरासरीच्या 105 टक्के पाऊस झाला आहे. सुमारे 3 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिलह्यातील 38 धरणे 100 टक्के भरली आहेत. पुरामुळे 13 गावे बाधीत झाली आहेत.