मुंबई:राज ठाकरे यांनी त्यांच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर महाराष्ट्रातील अनधिकृत मशीनच्या बांधकामावर शिंदे सरकारने कारवाई तातडीने कारवाई केली. त्यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी 22 तारखेला दादरच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या पाडवा मेळाव्यात सांगली आणि मुंबईच्या माहीम येथे अनधिकृत मशिदी बांधल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुढच्या काही तासातच शिंदे फडणवीस सरकारने या अनधिकृत मशिदी जमीनदोस्त केल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट लिहित सरकारचे आभार मानले होते. त्यानंतर या दोघांमध्ये ही सदिच्छा भेट होत असल्याने या भेटीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिंदे-ठाकरे जुने सहकारी: यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले. राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोघेही एकेकाळचे सहकारी आहेत. राज ठाकरे तत्कालीन शिवसेना सोडण्याआधी दोघेही एकाच पक्षात एकत्र काम करत होते. शिंदे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये स्नेहाचे संबंध आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांचे वर्षावर जाऊन अभिनंदन केले होते.