मुंबई :नागपूरात हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड या लोह प्रकल्पावर ( Surjagad Iron Project ) प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी सुरजागड या लोह प्रकल्पात जास्तीत जास्त स्थानिक नागरिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध ( Preference for locals employment in Surjagad Iron Project ) करून देण्याची ग्वाही विधान परिषदेत दिली.
स्थानिकांना नोकरीत प्राधान्य : मुख्यमंत्री म्हणाले की, हा लोहप्रकल्प 1993 मध्ये सुरू झाला. त्या भागातील नक्षलवादामुळे काही कालावधीत या प्रकल्पाचे काम पुढे नेऊ दिले जात नव्हते. त्यावेळी पालकमंत्री झाल्यानंतर प्रशासन, पोलीस यंत्रणा यांना नक्षलवादाचा बिमोड करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर सुरजागड प्रकल्प पुन्हा सुरू केला आहे. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाला स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता पाच हजारापेक्षा जास्त स्थानिक नागरिकांना या प्रकल्पात रोजगार दिला आहे.
प्रशिक्षण केंद्र सुरू करणार : सुरजागड प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबरोबर कुशल काम येण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. यामध्ये महिला, तरुणांना प्रशिक्षण देवून कुशल कामगार तयार करण्यात येईल. याशिवाय याठिकाणी सिक्युरिटी अकादमी सुद्धा सुरू केली जाईल. यामुळे या प्रकल्पासाठी कुशल कामगार बाहेरून आणावे लागणार नाहीत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पातून 342 कोटींचा महसूल : सुरजागड लोह प्रकल्पातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला. शिवाय 342 कोटींचा महसूलही शासनाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पात स्थानिकांवर कोणताही अन्याय होणार नाही, या भागातील नक्षलवाद पूर्ण कमी झाला असल्याने पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
आरोग्य आणि पायाभूत सुविधा : सुरजागड प्रकल्प सर्व परवानग्यांची पूर्तता करून 2021-22 या काळात पूर्ण क्षमतेत नियमाच्या अधीन राहून चालू आहे. गडचिरोली जिल्हा गौण खनिजाचा ठेवा आहे. यामधून आतापर्यंत 56 लाख टन गौण खनिज प्राप्त झाले आहे. याच कंपनीने घोनसरी येथे 20 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प वर्षभरात सुरू होऊन 1500 जणांना रोजगार मिळणार आहे. परिसरातील गावात आरोग्य आणि पायाभूत सुविधा निर्माण करणार असल्याचे खनिज कर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.