मुख्यमंत्री शिंदे माहिती देताना मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच उर्वरित महाराष्ट्रासह कोकणात पावसाने जोरात बॅटिंग केली आहे. राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मदतीच्या सूचना दिल्या :हवामान खात्याने येत्या चार दिवसात कोकणसह महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच सर्वांना मदतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिथे-जिथे आवश्यक वाटेल तिथे स्थलांतर आणि मदत पोहचण्यासाठी सांगितले आहे. कुठल्या परिस्थितीत नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व उपाय योजना करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
एनडीआरएफ तुकड्या तैनात: जिल्हा प्रशासन देखील अलर्ट आहे. जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणा फिल्डवर अलर्ट राहून काम करत आहेत. तसेच नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन, मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. एनडीआरएफ तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. जिथे लोकल बंद आहेत तिथे बेस्ट बसेस सोडण्यात याव्यात अशा सूचना आयुक्तांना दिल्या आहेत. यामुळे लोकांचा त्रास कमी होणार आहे.
प्रशासनाने सज्ज राहावे :राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनाकडून फोनच्या माध्यमातून, राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस त्या ठिकाणी NDRF, SDRF च्या टीम आवश्यकतेनुसार सज्ज ठेवावी, तसेच कोणत्या स्थितीशी तोंड देण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे असे निर्देश दिले आहेत. येत्या काही दिवसात जास्त मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या भागात, नागरिकांना माहिती देण्याचे काम करावे. तसेच मानवाच्या चुकीमुळे शेतीचे नुकसान होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत.
शाळांना सुटी जाहीर :अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठीही प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. शिक्षण आयुक्त मांढरे यांनी अतिवृष्टीच्या ठिकाणी संबंधित ठिकाणची परिस्थिती पाहून शाळांना सुटी जाहीर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर मधील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सरसकट सगळ्यांना सुट्टी दिली नसून स्थानिक परिस्थितीचा विचार करुन याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याची सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -
- Eknath Shinde on President Rule : राष्ट्रपती राजवट लागू करण्याची बाळासाहेब थोरातांची मागणी हास्यापद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Balasaheb Thorat On CM : मंत्रिमंडळ खातेवाटपावरून बाळासाहेब थोरातांची शिंदेंवर टीका
- आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विभागात राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमा, मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश