मुंबई :विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राहुल गांधी यांना जोडे मारा आंदोलन केले. अशा पद्धतीने राष्ट्रीय नेत्याचा अपमान करणे विधिमंडळाच्या आवारात आमदारांना शोभत नाही जर असे असेल तर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनाही अशा प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा विरोधी पक्षातील नेत्यांनी दिला होता.
विरोधकांची कारवाईची मागणी :यासंदर्भात आज सभागृह सुरू होताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या गोष्टीचा निषेध करीत ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात केली. पटोलेंच्या मागणीनंतर सभागृहात दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही गोंधळ सुरू केल्याने सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले या कामकाजात प्रश्नोत्तराचा तासही झाला नाही. अखेर, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात येऊन उत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांनी दिले प्रत्युत्तर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदर्भात सांगितले की, गुरुवारी सभागृहाच्या आवारात जे जोडे मारण्याचे आंदोलन झाले त्याचे आम्ही कधीही समर्थन केले नाही, करणार नाही, सावरकर यांच्या बद्दल अशा पद्धतीचे अनुद्गार काढणे, तोही देशद्रोह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाची कीर्ती जगात पसरवली आहे. या देशाचा मान आणि देशाची कीर्ती जगभर पोहोचवणाऱ्या पंतप्रधानांचा अपमान करणे ही निश्चितच निंदनीय बाब आहे.