मुंबई (भाईंदर) :मुख्यमंत्री स्वच्छता अभियानावरती विरोधी पक्षाकडून फोटो फोटोसेशनचा आरोप करण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली आहे. आम्ही रस्त्यावर उतरून झाडू हातात घेऊन कामातून उत्तर देत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील झाडू हातात घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला. आम्ही रस्त्यावर उतरून स्वच्छतेसाठी काम करत आहोत. यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे. त्यामुळं विरोधी पक्षाला टीका करू द्या, आम्ही आमचे काम रस्त्यावर उतरून करत राहू असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
स्वच्छता अभियानाची केली सुरुवात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मिरा-भाईंदरचा दौरा केला. मुख्यमंत्री स्वच्छता अभियान संपूर्ण राज्यभर सुरू असून सकाळी ठाणे त्यानंतर मिरा भाईंदर येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. यावेळी पाण्याचा फवारा मारत रस्ते साफ केले. तर हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून नव्याने खरेदी करण्यात आलेल्या यंत्रणेची पाहणी देखील शिंदे यांनी केली. जालन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाबरी मशिदीवर केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती घेऊन सांगू असं उत्तर देऊन प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मुंबई महापालिकेनं डीप क्लिनिंग ड्राईव्ह हाती घेतला: स्वच्छ सुंदर मुंबईसाठी महापालिकेनं कंबर कसली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेनं 'डीप क्लिनिंग ड्राईव्ह' हाती घेतला आहे. या स्वच्छता मोहिमेचा परिणाम दिसून येत असून मागील पंधरा दिवसात 1200 मेट्रिक टन कचरा तसंच राडारोडा संकलन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दैनंदिन कचरा जमा करण्याबरोबरच इतरही कचरा जमा करुन मुंबई स्वच्छ करण्यात मुंबई महापालिकेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सुद्धा या सफाई मोहिमेतून मुंबई महापालिकेनं मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या निर्धारानं टाकलेलं पाऊल यशस्वी होताना दिसत आहे.